Home » जळगाव » जळगाव रेल्वे स्थानकावर महिला वकिलाचा अपघाती मृत्यू !

जळगाव रेल्वे स्थानकावर महिला वकिलाचा अपघाती मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव स्थानकावर थांबा नसलेल्या मंगला एक्सप्रेसमधून उतरताना झालेल्या अपघातात अॅड. वर्षा साहेबराव बिऱ्हाडे (गायकवाड) यांना गंभीर दुखापत झाली होती. डोक्यावर जोरात घाव बसल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भोईटे नगर येथे राहणाऱ्या अॅड. बिऱ्हाडे या जळगाव व कल्याण येथे वकिली करत होत्या. त्या गुरुवारी मुंबईहून मंगला एक्सप्रेसने जळगावकडे परतत होत्या. मात्र, मंगला एक्सप्रेसला जळगाव स्थानकावर थांबा नसल्याने गाडी स्लो झाली असताना काही प्रवाशांनी उतरण्याचा प्रयत्न केला. त्यांना पाहून अॅड. बिऱ्हाडे यांनीही उतरण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्यांचा तोल जाऊन त्या फलाट क्रमांक ३ वर जोरात डोक्यावर पडल्या. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती त्यांच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या अपघाताची नोंद रेल्वे पोलिसांकडे अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिण आणि एक मुलगा असा परिवार आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *