Home » जळगाव » २१ वर्षीय तरुणाला संशयावरून मारहाण घरी पोहचताच मृत्यू : जामनेर हादरले !

२१ वर्षीय तरुणाला संशयावरून मारहाण घरी पोहचताच मृत्यू : जामनेर हादरले !

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुण पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या तरुणाला संशयावरून काही तरुणांनी जबर मारहाण केली. घरी पोहोचल्यावर जखमी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना जामनेर शहरात सोमवारी दुपारी घडली. सुलेमान रहिमखान पठाण (२१, रा. बेटावद खुर्द, ता. जामनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सुलेमान हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलिस भरतीची तयारी करीत होता. सोमवारी तो जामनेरला पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आला होता. शहरातील एका सायबर कॅफेत तो बसला होता. त्याचवेळी संशयावरून शहरातील काही तरुणांनी त्याला जबर मारहाण केल्याचे सांगण्यात आले. या तरुणांनी त्याला बेटावद खुर्द गावापर्यंत मारहाण करीत नेल्याची माहिती मिळाली. घरी पोहोचल्यावर तरुणाने ही घटना आजोबा व वडिलांना सांगितली. पाणी प्यायल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाच्या पश्चात आजोबा, आई, वडील, दोन विवाहीत बहिणी आहेत. परिवारात तो एकुलता होता. सायंकाळी मातत्या समागम जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात सुलेमान याचा मृतदेह आणण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जामनेरला भेट दिली. दोषींना तातडीने अटक करा, या मागणीसाठी पोलिस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला होता. पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार हे बेटावद खुर्द येथे तपासासाठी रवाना झाले आहेत.

सुलेमान याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या तपासात दहा संशयितांची नावे समोर आली आहेत. त्यापैकी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी रात्री पत्रकारांना दिली. इतर संशयितांच्या शोधासाठी एलसीबीसह पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबत जमावाच्या मारहाणीत मृत्यू १०३(१), १०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *