मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका लुटल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरेंचे राजकीय धर्मांतर झाल्याचा दावा करत त्यांनी ठाकरे बंधूंमधील नातेसंबंध आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी दिलेल्या आमंत्रणावरही भाष्य केले आहे. याशिवाय, मतचोरीच्या मुद्द्यावरही राणे यांनी आपले मत मांडले.

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवत म्हटले की, “उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याऐवजी मातोश्रीवर मोर्चा काढावा. त्यांची मर्सिडीज, कपडे आणि एसी हे सारे पालिकेच्या पैशातून विकत घेतले आहे.” राणे यांनी पुढे असा दावा केला की, ज्याप्रकारे मुघलांनी भारत लुटण्यासाठी कटकारस्थान रचले, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका लुटण्यासाठी कट रचला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवासाठी आमंत्रण दिल्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, “कोणाला बोलवायचे हा ठाकरे बंधूंमधील कौटुंबिक विषय आहे. राज ठाकरे यांनी उद्धव यांना बोलावणे दिले ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही अशीच आहे की, सगळे एकमेकांशी नातेसंबंध ठेवतात. दोन भावांमधील वाद मिटून ते एकमेकांच्या घरी जात असतील तर त्यात काही गैर नाही.” मात्र, याचवेळी राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटले की, “उद्धव ठाकरेंचे राजकीय धर्मांतर झाले आहे. तरीही त्यांना राज ठाकरे यांच्या घरी गणपतीसाठी जाण्याची संधी मिळत असेल तर ही स्वागतार्ह बाब आहे.”
मतचोरीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आज सकाळी आम्ही मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून मतांची चोरी केली. आमच्यासाठी मतचोरी म्हणजे लोकांची मने जिंकणे. जे लोक आज मोदी एक्सप्रेसने गेले, त्यांनी मनातून भाजपला मतदान करण्याचा निश्चय केला आहे.” राणे यांनी पुढे सांगितले की, लोकांची मदत केल्याने ते ईव्हीएममध्ये मते टाकतात आणि त्यासाठी घरात बसून ओरडण्याची गरज नाही.
नितेश राणे यांच्या या वक्तव्यमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावरील या गंभीर आरोपांमुळे शिवसेना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, ठाकरे बंधूंमधील नातेसंबंध आणि राजकीय समीकरणांवर राणे यांच्या वक्तव्याचा काय परिणाम होतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.



