जळगाव : प्रतिनिधी
टाइल्स घेऊन जाणाऱ्या भरधाव मालवाहू वाहनाने चार दुचाकींना एकापाठोपाठ धडक दिल्याने या अपघातात स्वप्निल अशोक कापुरे (४०, रा. नवजीवन कॉलनी, वाघनगर) यांचा मृत्यू झाला. अन्य तिघेजण जखमी असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवारी (२ सप्टेंबर) रात्री रामानंदनगर घाटात घडली.

सविस्तर वृत्त असे कि, नवजीवन कॉलनीतील स्वप्निल कापुरे हे एका कंपनीत नोकरीला होते. त्यांची पत्नी एरंडोल येथे भूमिअभिलेख कार्यालयात नोकरीस आहे. कापूरे हे कंपनीतून दुचाकीने (एमएच १९, ईक्यू ४२१३) घरी जात असताना टाइल्स घेऊन जाणाऱ्या विनाक्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर मालवाहू वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून येणाऱ्या इतर दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यानंतर हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरले.
४० ते ५० फुटांपर्यंत फरफटत नेले स्वप्निल कापुरे यांना धडक दिल्यानंतर ४० ते ५० फुटांपर्यंत फरफटत नेले. दुचाकी वाहनाच्या खाली अडकल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच इतर दुचाकीवरील तिघाजणांना दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना कापुरे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.



