मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात भाजप व शरद पवार गटात नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार हे कारस्थानांचा कारखाना आहेत. कारस्थान कसे रचायचे हे त्यांच्याकडे पाहून शिकता येईल. त्यांनी निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण करायला लावून देशाची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे ते म्हणालेत.
गोपीचंद पडळकर बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शरद पवार हे कट कारस्थानाचा कारखाना आहेत. कारस्थान कसे रचायचे हे त्यांच्याकडे पाहून शिकता येईल. मारकडवाडी प्रकरणात त्यांनी देशाची दिशाभूल करत निवडणूक आयोगाविषयी संशयावस्था निर्माण केली. आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. निवडणूक या देशाचा गाभा आहे. त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे हा देशद्रोह आहे. त्यामुळे पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
शरद पवार हे आधुनिक काळातील नारदमुनी आहेत. एकीकडे ते मंडल यात्रा काढतात, तर दुसरीकडे त्यांचा नात मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून आंदोलन करतो. ही दुतोंडी भूमिका आहे. ते कारस्थान रचून एखाद्या यंत्रणेविषयी संशय निर्माण करतात. चिठ्ठ्या गिळता येतात. पळवता येतात. त्यामुळे सहकार क्षेत्रात शरद पवारांचे प्राबल्य आहे. सहकारात ईव्हीएम आले, तर त्यांचे प्राबल्य संपुष्टात येईल. निवडणूक हा या देशाचा गाभा आहे. त्यावर षडयंत्र रचून शंका घेण्यास भाग पाडणे हा देशद्रोह आहे. पवारांनी स्वतः सांगितले की, माझ्याकडे 2 जण आले होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीत 160 आमदार निवडून आणण्याची ऑफर दिली होती. ही ऑफर दिल्यानंतर त्यांनी तत्काळ गृहमंत्र्यांना फोन करून त्याची माहिती देणे गरजेचे होते. पण शरद पवारांनी हा प्लॅन राहुल गांधींना सांगितला. त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर 8 महिन्यांनी त्यांनी ही गोष्ट सार्वजनिक केली. तुम्ही पोलिसांकडे जाण्याऐवजी राहुल गांधींकडे गेला म्हणजे हे कारस्थानच आहे, असे पडळकर म्हणाले.
शरद पवारांना आता ते 2 जण कोण होते हे आठवत नाही. त्यांना 50 वर्षांपूर्वी भेटलेले लोक व गोष्टी आठवतात. पण 8 महिन्यांपूर्वी भेटण्यास आलेले लोक का आठवत नाहीत? असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी उपस्थित केला.



