बुलडाणा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना आता एक भीषण अपघाताची घटना बुलडाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. अज्ञात वाहनाने चारचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीररीत्या जखमी आहेत. ही घटना चिखली-रणथमनजिक महामार्गावर मध्यरात्री ११.४० वाजता घडली. चारचाकी वाहनाने काही प्रवासी जळगावकडून नागपूरकडे येत होते. महामार्गावर मलकापूर तालुक्यातील चिखली-रणथमनजिक चारचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात घडला.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस निरीक्षक हेमराज कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतक व गंभीर जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यात गंभीर जखमींपैकी चार जणांना जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले आहे तर एकाला बुलडाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
अपघात घडल्यानंतर पोलिसांनी महामार्गावर ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत केली. उशिरा रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले आदींनी घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली आहे. पोलिसांनी त्या अज्ञात वाहनाच्या शोधार्थ रात्रीच हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात मृतकापैकी चारचाकी चालक साजीद अजीज बागवान (वय ३०, रा. भुसावळ, जि. जळगाव खान्देश)अशी एकाची ओळख पटली आहे. तर उर्वरित तीन मृतक महिलांची ओळख अद्याप पटलेली नाही. एमआयडीसी पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.



