मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “मतचोरीचा” पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी म्हटले आहे. त्यांनी दावा केला की चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात ६,८५० मतांमध्ये फेरफार करण्यात आला आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयाच्या अंतर्गत राज्य पोलिसांनीही या प्रकरणात एफआयआर नोंदवला.

“महाराष्ट्रात लोकशाही कशी मोडतोड केली जात आहे हे राहुल गांधींनी पुन्हा एकदा उघड केले आहे. राजुरा येथे ६,००० हून अधिक मतांची चोरी, आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरने पुष्टी केली आहे, हे सिद्ध करते की महायुती आघाडीला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही,” असे सपकाळ ठाण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले.
“भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मते चोरून सत्ता काबीज केली. फडणवीस यांनी डोळे उघडून तात्काळ राजीनामा द्यावा,” असे पक्षाच्या कोकण विभागाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग दुटप्पीपणाने वागत असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे राजकीय नेत्यासारखे बोलत आहेत.”लोकशाही उलथवून टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप भारताला नेपाळ किंवा श्रीलंकेसारखे बनवू इच्छितात,” असा आरोप त्यांनी केला. सपकाळ यांनी अलिकडच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणांना “राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय” असे संबोधले आहे.



