भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीला सतत अश्लील कमेंट्स करून त्रास देणाऱ्या तिघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पीडितेच्या नातेवाइकासह त्याच्या मित्रालादेखील मारहाण करून दुखापत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी आपल्या दोन मैत्रिणींसोबत महाविद्यालयाच्या मैदानावर बॅडमिंटन खेळत असताना, आरोपी प्रणय गणेश निहारे, आदिल खान मुकीम खान व भावेश शशिकांत बहिरुने यांनी शिट्ट्या मारून अश्लील कमेंट्स केले.
या घटनेची माहिती पीडितेच्या नातेवाईकास मिळाल्यावर तो महाविद्यालयात आला. त्याने आरोपींना जाब विचारला असता, त्यांनी उलट त्याच्यावर हल्ला करून त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत केली. याचदरम्यान सोबत असलेल्या अन्य एकासही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पीडितेचे फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.



