Home » जळगाव » जिल्ह्यात पावसाचा कहर : ३५ वर्षीय तरुण गेला वाहून !

जिल्ह्यात पावसाचा कहर : ३५ वर्षीय तरुण गेला वाहून !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात परतीच्या पावसाचे तडाखे सुरूच आहेत. पाचोरा तालुक्यात आठवड्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. पाचोरा महसूल मंडळात ८ तासांत तब्बल १४७ मिमी पाऊस झाला आहे. भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला अक्षरशः पाण्याचा वेढा पडला होता; तर दुसरीकडे अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने जमीन खरडून निघाली. भोकरी येथील एकाचा मृतदेह पुराच्या पाण्यात आढळून आला. उत्राण (ता. एरंडोल) व चोरवड (ता. पारोळा) येथील गावांत पाणी शिरल्याने दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी रस्ते काही वेळ बंद झाले होते. दरम्यान, जिल्ह्यात २३ व २४ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील चाळीसगाव पाचोरा, भडगाव, पारोळा आणि एरंडोल तालुक्यांत काही ठिकाणी रविवारी रात्रीपासून, तर काही ठिकाणी सोमवारी सकाळपासून मुसळधार आणि काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. पाचोरा तालुक्यात तर अनेक लघु प्रकल्प पूर्ण भरले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पारोळा तालुक्यात रविवार रात्री चबुतरे, धुळपिंप्री, मंगरूळ, वाघरे, वाघरी, चोरवड, खोलसर या भागांतील शेती पाण्याखाली गेली आहे. वाघरा-वाघरी या गावांचा संपर्क तुटला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाला दिले आहेत. सोमवारी पालकमंत्री पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाचोऱ्यात नुकसानीची पाहणी केली. भोकरी (ता. पाचोरा) येथील सतीश मोहन चौधरी (३५) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. यानंतर त्यांचा मृतदेह सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास वरखेडी येथील नाल्याच्या पुरात आढळून आला. सोनबर्डी, ता. एरंडोल या गावाच्या जुन्या गावठाणाला पुराचा वेढा पडला आहे. यात जवळपास ५० ते ६० जण अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले होते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *