Home » राष्ट्रीय » शंभर टक्के भरपाई द्या..अन्यथा महाराष्ट्र बंद ; जरांगे पाटलांचा इशारा !

शंभर टक्के भरपाई द्या..अन्यथा महाराष्ट्र बंद ; जरांगे पाटलांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठवाड्याला अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पूराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पावसामुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील चिंचपुर ढगे व पिंपळगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त चिंचपुर ढगे तसेच पिंपळगाव परिसरात भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. तसेच त्यांना धीर देण्याचे देखील काम त्यांनी केले. तसेच जेवढे नुकसान झाले तेवढी मदत द्यावी, अन्यथा महाराष्ट्र बंद करण्यात येईल, असा इशारा सरकारला दिला आहे. मदतीसाठी जनावरांचे मृतदेह लागतील अशा अव्यवहार्य अटी रद्द करून शेतकऱ्यांना तात्काळ 100 टक्के आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांना धीर देताना म्हटले की, शेतमालाचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांचे झालेले नुकसान या साऱ्या गोष्टी गंभीर आहेत. सरकारने तात्काळ मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करताना 50 टक्के, 60 टक्के असे करू नका, असे आवाहन जरांगे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना केले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे देखील जरांगे यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे पीक आडवे झाले आहे, तर काही ठिकाणी तर पिकांचा अक्षरशः चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांच्या शेतांमध्ये तर कमरेएवढे पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे सरकारकडून तातडीने मदतीची याचना शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *