मुंबई : वृत्तसंस्था
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मी आयुष्यात इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री तर पाहिला नाही, मुख्यमंत्री इतके बनावट आहेत, की झेरॉक्स तरी बरी निघते, झेरॉक्सच यांची निघत नाही अशी बोचरी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली होती. आता पुन्हा एकदा कडू यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

ओला दुष्काळावर बोलणारे दोन फडणवीस पाहायला मिळाले असल्याचा टोला बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून सरकारवर टीका करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने ओला दुष्कार जाहीर करण्याबाबत कडू यांनी संतप्त सवाल केला आहे.
सरकारने ओला दुष्काळ नाही तर त्याचे सर्व निकष लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर कडू यांनी ओला दुष्काळावर बोलणारे दोन फडणवीस पाहायला मिळाले असल्याचं म्हटलं आहे. पैशाचं सोंग उभं करता येत नाही, असं अजितदादा म्हणत आहेत. ‘ओला दुष्काळ’ हा कायद्यात शब्द नाही, असं म्हटलं जात आहे. परंतु, आपत्तीग्रस्त म्हणून जिल्हा घोषित करता येतो, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. ते कसं याबाबतही त्यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली.
कलम ४६ राज्यासाठी आणि कलम ४८ देशासाठी आहे. हे केवळ शब्दांचे खेळ आहेत असं ते म्हणाले. तसेच राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत त्यांनी भाष्य करत रोज १० ते १५ आत्महत्या कानावर येत आहेत. सर्वपक्षीय आणि सर्व जातीय नेत्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी लढण्याची गरज असल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.



