Home » महाराष्ट्र » हाजी अलीत हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? मंत्री नितेश राणे !

हाजी अलीत हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? मंत्री नितेश राणे !

पुणे : वृत्तसंस्था

शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का? उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याच्या भूमिकेवरही उद्विग्नता व्यक्त केली.

पुण्यातील शनिवारवाड्यात अज्ञात मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी व पतीत पावन संघटनेने या प्रकरणी रविवारी जोरदार आकांडतांडव केले. त्यानंतर आता भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनीही या वादात उडी मारून मुस्लिम समाजाला उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा सवाल केला आहे.

नीतेश राणे सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, या लोकांना नमाज पडण्यास दुसरी जागा नाही का? उद्या आमच्या हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी हाजी अलीला जाऊन हनुमान चालीसा म्हटली तर चालेल का? शनिवारवाडा हा आमच्यासाठी हिंदू समाजाचे प्रतीक असणारे धार्मिक स्थळ आहे. तुम्ही तिथे नमाज पठण करत असाल तर उद्या हाजी अलीत आमचे कार्यकर्ते जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसाचे पठण केले तर मग काय होईल? तुम्ही जो न्याय हाजी अलीला लावला, तोच न्याय इतर धार्मिक स्थळांनाही लावा. शनिवारवाड्यात जाऊन नमाज पठण कशाला केला? याविरोधात हिंदू संघटनांनी आवाज उचलला तर त्यात काहीच चूक नाही.

नीतेश राणे यांनी यावेळी कथित मत चोरीच्या मु्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राज ठाकरे हे मुद्देसूद बोलतात. त्यांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येते, त्यावर लोक विचार करतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. पण त्यांच्या कालच्या सभेनंतर अशा पद्धतीचे मतचोरीचे आरोप लोकसभा निवडणुकीनंतर का झाले नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. लोकसभेला एकेका मतदारसंघात लाख-दीड लाख मतदान झाले. महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जिंकून आले. तेव्हा मतचोरीचे व व्होट जिहादचे आरोप कुणीही केले नाहीत.

हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवण्यात आले. पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्यात आले. त्यावरही कुणी आक्षेप घेतला नाही. लोकसभेला हिरवा गुलाल उधळला गेला त्याचे उत्तर महाराष्ट्रातील हिंदू जनतेने विधानसभेला भगवा गुलाल उधळून दिले. त्यानंतर मतचोरीचे आरोप सुरू झाले. राज ठाकरे सध्या ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, हा त्यांच्या संगतीचा परिणाम आहे. कारण, उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाली आहे, असे नीतेश राणे म्हणाले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *