धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव-चोपडा रस्त्याच्या रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुरू असून रस्त्यावर तसेच साईडपट्टयांवर मोठ्या प्रमाणात पिवळी माती टाकण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या आणि सुरू असलेल्या पावसामुळे या साईडपट्ट्यांवरील माती चिखलात बदलली असून वाहनं घसरून रुतत आहेत. मंगळवारीही अनेक वाहने रुतल्याचे दिसून आले.

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी रोटवट गावालगत मालवाहू वाहने चिखलात रुतण्याचे प्रकार घडले. दुपारपर्यंत चार ते पाच वाहने अडकली होती. क्रेन आणि जेसीबीच्या मदतीने ती बाहेर काढण्यात आली. सावखेडा दरम्यान इंग्लिश मीडियम स्कूलजवळ २७ ऑक्टोबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास मालवाहू ट्रक साईडपट्टीवरील पिवळ्या मातीच्या चिखलात रुतून उलटता उलटता थोडक्यात बचावला. जवळच मुख्य वाहिनीचा विद्युत खांब असल्याने अपघात झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. रात्री ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रक बाहेर काढण्यात आला. तोपर्यंत परिसरातील वीजपुरवठा हा खबरदारी म्हणून खंडीत करण्यात आला होता. त्यानंतर तो सुरळीत करण्यात आला.



