Home » महाराष्ट्र » २ फॉर्च्यूनर, २ थार, ७ ट्रॅक्टर बक्षीसात : बैलगाडा शर्यतीची राज्यभर चर्चा !

२ फॉर्च्यूनर, २ थार, ७ ट्रॅक्टर बक्षीसात : बैलगाडा शर्यतीची राज्यभर चर्चा !

सांगली : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात दाखल झालेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता राजकारणासोबतच खेळाच्या मैदानावरही लक्ष वेधून घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात तासगावजवळ येत्या 9 नोव्हेंबर रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यातील बैलगाडा शर्यतीसाठी जाहीर केलेल्या भुवया उंचावणाऱ्या बक्षिसांमुळे ही शर्यत राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

येत्या ९ नोव्हेंबर रोजी तासगावजवळ चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन मोठ्या दिमाखात होणार आहे. या शर्यतीची बक्षिसांची यादीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विजेत्यांसाठी 2 फॉर्च्यूनर कार, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि तब्बल 150 दुचाकी अशी भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. राज्यभरात आजवर कधीही इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या किमतीची बक्षिसे देणारी स्पर्धा झालेली नाही, त्यामुळे या बैलगाडा शर्यतीची राज्यभरात चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत तीन फेऱ्यांची जनरल बैलगाडा शर्यत आणि पट्टा पद्धतीची शर्यत घेतली जाणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकांना चारचाकी गाड्या, ट्रॅक्टर आणि दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.

तसेच उत्तेजनार्थ अनेक दुचाकी आणि इतर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. या शर्यतीचा प्रमुख उद्देश केवळ मनोरंजन नव्हे, तर ग्रामीण क्रीडा परंपरा, गोवंश आणि पशुसंवर्धनाचा प्रसार करणे असल्याचे चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रातील हे पहिले बैलगाडा शर्यत संघटनेचे अधिवेशन 9 नोव्हेंबर रोजी तासगावजवळ आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा आणि श्वान शर्यतीचेही आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमाला राज्यभरातील चार ते पाच लाख शेतकरी आणि गाडीमालक उपस्थित राहतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *