पालघर : वृत्तसंस्था
पालघर जिल्ह्यातील वसई परिसरातील एका खासगी शाळेत सहावीत शिकणारी १३ वर्षांची विद्यार्थिनी अंशिका गौर हिचा १५ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. कुटुंबीयांचा गंभीर आरोप आहे की, शाळेत देण्यात आलेल्या शिक्षेमुळेच मुलीची प्रकृती खालावली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

अंशिका वसईतील सातिवली येथील श्री हनुमान शाळेत शिकत होती. मनसे पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी ती आणि आणखी चार विद्यार्थी १० मिनिटे उशिरा शाळेत पोहोचले होते. शिक्षा म्हणून चारही विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० उठाबशा काढायला लावण्यात आल्या. अंशिकाच्या आईने सांगितले की, मुलीच्या खांद्यावर शाळेची जड बॅग ठेवून तिला उठाबशा काढायला भाग पाडण्यात आले. त्यानंतर तिच्या मुलीला तीव्र पाठदुखी व मानेदुखी सुरू झाली आणि ती उभीही राहू शकत नव्हती. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अंशिकेच्या आईचा स्पष्ट आरोप आहे की शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळेच मुलीची तब्येत ढासळली. “मुलगी १० मिनिटे उशिरा आली म्हणून इतकी कठोर शिक्षा देणे योग्य नाही. बॅग पाठीवर ठेवून १०० उठाबशा ही शिक्षा नव्हे तर अमानुषता आहे,” असे त्या म्हणाल्या.
मनसे नेते सचिन मोरे यांनी सांगितले की, अंशिकेला याआधी आरोग्य समस्या होत्या, तरीही तिला अशी शिक्षा दिली गेली. शाळेतील एका शिक्षकाने सांगितले की, मुलीने प्रत्यक्षात किती उठाबशा काढल्या हे स्पष्ट नाही आणि मृत्यूचे कारणही तपासानंतरच निश्चित होईल. गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलंगे यांनी या घटनेची चौकशी सुरू असल्याची पुष्टी केली. “तपासातच मृत्यूचे खरे कारण समोर येईल,” असे ते म्हणाले. या घटनेबाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. अंशिकेच्या मृत्यूमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये शाळेतील शिक्षेच्या पद्धतीबाबत चिंतेचे वातावरण आहे.



