मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये नाराजी सुरु असल्याने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा खरपूस समाचार घेतला. सध्या सत्ताधारी महायुतीत एकमेकांच्या नसा आवळण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे एक कुणीतरी गेलंय, बाबा मला मारले म्हणून दिल्लीला. या दिवट्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही, असे ते म्हणालेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून गुरुवारी डिजिटल बोर्डचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आयुष्यात चांगले शिक्षक व चांगले शिक्षण मिळाले नाही तर काय होते हे आपण पाहतो. उदाहरणार्थ, दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे… त्यामुळे असे जे काही दिवटे निघालेत त्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही आणि कळणारही नाही. ही मराठी भाषेची गंमत आहे.
आता मी पण आमदार आहे. सगळे आमदार, खासदार आपला फंड वापरतात. पण हा फंड विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांना देताना हात आखडता घेतला जातो. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात. हे सर्व आपण बातम्यांमध्ये वाचतो. पण आता कहर म्हणजे, त्यांच्यातच एकमेकांच्या नसा आळण्याचे काम सुरू झाले आहे. एक कुणीतरी गेलंय बाबा मला मारले म्हणून दिल्लीला. ही लाचारी का? तर तेच की, त्या वयात चांगले शिक्षक मिळाले असते तर ही वेळ आलीच नसती.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांना व माझ्या आजोबांना (प्रबोधनकार ठाकरे) दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. दोघांनाही इयत्ता सातवीत फी भरण्यास पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली. पण शाळा सुटली तरी त्यांचे शिक्षण थांबले नाही. कारण, घरामध्ये संस्कार नावाचा एक विषय असतो. आपण मुलांना संस्कारित करतो. आई-वडिल आपल्या मुलांना स्वतःच्या वागणुकीतून मुलांना संस्कार देतात. आपण जसे वागतो, तशी आपली मुले वागत असतात. आणि मग घराणेशाही म्हणजे तशीच… म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा की, मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार. या सर्व गोष्टी संस्कारातून येतात.



