छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

संतोष भैय्याला न्याय मिळाल्या शिवाय आपण त्यांच्या कुटुंबियांच्या मागून एक इंच सुद्धा मागे हटणार नाही, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असून सूर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी देखील आपण आहोत. असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी लॉन्ग मार्च मुंबईकडे जाणार आहे. हा लॉन्ग मार्च ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्याने लागणाऱ्या सर्व गावातून त्यांच्या नष्ट्याची सोय करून देण्यात यावी अशी मी विनंती करतो. आता आरोपींना अटक झाली आहे. एक जण राहिला आहे, त्याचा शोधही लागेलच. ही एक मोठी साखळी आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. कुठल्या सरकारने देखील असे नेटवर्क पहिले नसेल.
या नेटवर्कने आपल्या संतोष भैय्याचा जीव घेतला आहे. या नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या टीम आहेत. खंडणी मागायला वेगळी, अपहरण करायला वेगळी. बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत, चोरी करणारी वेगळी टीम, आणि या सर्वांना सांभाळणारा एक जण आहे. ज्याने खंडणी मागायला पाठवले तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, ज्याने खून करणाऱ्याला पाठवले तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, तो आधी जेलमध्ये गेला पाहिजे. यातील एकही आरोपी सुटणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.



