बुलढाणा : वृत्तसंस्था
तेलंगणातून जळगावकडे निघालेले एक दाम्पत्य मार्गातच गूढरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर गावाजवळ आढळल्याने त्यांच्या घातपाताचा संशय अधिक गडद झाला आहे. दरम्यान, नांदुरा पोलिसांनी बेपत्ता दाम्पत्याच्या शोधासाठी विशेष पथक तैनात केले आहे.

या प्रकरणी रमेश पाटील यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे चुलतबंधू पद्मसिंह दामू पाटील हे पत्नी नम्रता आणि मुलीसह तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथे राहतात. पद्मसिंह खाजगी सिमेंट कंपनीत नोकरीस असून, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास ते कारने स्वतःच्या गावी जळगाव येण्यासाठी निघाले. प्रवासादरम्यान सकाळी झालेल्या बोलण्यानंतर त्यांचा फोन रात्रीपर्यंत उपलब्ध होता. मात्र, अपेक्षित वेळ रात्री 10 वाजेपर्यंतही ते घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पद्मसिंह आणि त्यांच्या पत्नी दोघांचेही मोबाईल फोन बंद मिळाल्याने संशय निर्माण झाला.
नातेवाईकांनी रात्रभर शोध घेतला पण कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर 28 नोव्हेंबर रोजी त्यांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. शोधमोहीम सुरू झाल्यानंतर मोबाईल लोकेशनवरून दाम्पत्याचे शेवटचे ठिकाण खामगाव–मलकापूर महामार्गावरील वडनेर भोलजी परिसरात असल्याचे आढळले. यानंतर त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला. पोलिस आता वडनेर परिसरात तपासाचा फोकस वाढवत असून, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व स्थानिकांकडून माहिती घेत आहेत. घातपाताचा संभव व्यक्त करत तपास अधिक कडक करण्यात आला आहे. या घटनेने पद्मसिंह यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.



