मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी सुरु असलेल्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्याची घोषणा झाली असून आता यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राज्यातील निडवणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. आयोग कोणता कायदा काढतंय किंवा तो कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूकच पुढे ढकलायची हे अतिशय चुकीचे आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट टाळली. तसेच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर झालेल्या छापेमारीवरही भाष्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रचारसभेला जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ते म्हणाले, माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येकवेळी कुणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणुका पोस्टपाँड होतील. असे आजवर कधीच झाले नाही.
फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोग कुठला कायदा काढतंय किंवा आयोग कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण मी जो कायदा पाहिला, जेवढा माझा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशीही बोललो, या सर्वांचे मत आहे की, अशा पद्धतीने या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून पुढे ढकलता येत नाहीत. हे अतिशय चुकीचे आहे. पण निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यांना निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. पण माझे मत आहे की, निवडणूक आयोगाने निवडणुका लांबणीवर टाकलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे. प्रामाणिकपणे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवर झालेला हा अन्याय आहे. उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही ती लांबणीवर टाकता, यामुळे त्यांचे श्रम व मेहनत वाया गेली. आता 15 – 20 दिवस त्यांनी पुन्हा प्रचार करायचा. सरकार या प्रकरणी निवडणूक आयोगापुढे सादरीकरण करून हा निर्णय चुकीचा आहे हे सांगेन, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर टाकण्यात आलेल्या छापेमारीवरही भाष्य केले. मला याची कल्पना नाही. पण कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे यावरून रेड ठरत नाही. आमच्याही एखाद्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार आली तर त्याही प्रकरणात चौकशी होते. माझीही गाडी तपासली जाते. त्यामुळे या प्रकरणी सत्ताधारी किंवा विरोधक अशा कोणत्याही गोष्टी नसतात, असे ते म्हणाले.



