Home » महाराष्ट्र » चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; उद्यापासून सुरू होणार हिवाळी अधिवेशन !

चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; उद्यापासून सुरू होणार हिवाळी अधिवेशन !

नागपूर : प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपूर सज्ज झाली असून उद्या (सोमवार)पासून अधिवेशनाचा प्रारंभ होत आहे. मात्र, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच ‘इंडिगो’ एअरलाईन्सच्या मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर उड्डाणांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने मंत्री, आमदार आणि सनदी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक उड्डाणे रद्द झाल्याने काही लोकप्रतिनिधींनी रेल्वेचा, तर मोठ्या संख्येने नेत्यांनी ‘समृद्धी महामार्गा’चा पर्याय स्वीकारत नागपूर गाठले.

दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रामगिरी’ निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंपरेनुसार विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकत महाविकास आघाडीची स्वतंत्र बैठक बोलावली. या बैठकीस काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, अभिजित वंजारी, अतुल लोंढे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील भास्कर जाधव, सुनील प्रभू, अनिल परब आदी नेते उपस्थित होते.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकही पार पडली. आठ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका आणि विरोधकांची आक्रमक रणनीती दिसण्याची चिन्हे आहेत.

महायुती सरकारच्या कार्यकाळातील हे पहिलेच हिवाळी अधिवेशन असल्याने शहरात Welcome होर्डिंग्जची रेलचेल पाहायला मिळत आहे. विमानतळापासून विधानभवनापर्यंत नेत्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले असून वातावरणात राजकीय रंग अधिकच गडद झालेला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *