धाराशीव : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील चोराखळी येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय विवाहित तरुणाने नर्तकीसोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अश्रूबा कांबळे (वय 25) असे असून तो गेल्या पाच वर्षांपासून धाराशीवच्या साई लोकनाट्य कला केंद्रातील एका नर्तकीच्या प्रेमात होता.

अश्रूबा कांबळे आणि संबंधित नर्तकी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. दोघेही वारंवार सहलींना जात असत. अश्रूबा हा विवाहित असूनही संबंध कायम होते. 8 डिसेंबर रोजी दोघेही शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर ते परत येत असताना घटनांची शृंखला शोकांत वळण घेणारी ठरली.
परतताना अश्रूबाच्या मोबाईलवर त्याच्या पत्नीचा फोन आला. हा कॉल पाहताच नर्तकी संतापली आणि “पत्नीचा फोन का येतो?” अशा कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद तीव्र झाल्यानंतर अश्रूबाने भावनेच्या भरात, “मी आत्महत्या करेन,” अशी धमकी दिली. मात्र नर्तकीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समजते. पुढे रागाच्या भरात अश्रूबा कांबळेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणाची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात वाद, प्रेमसंबंध आणि भावनिक तणावामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलीसांनी नर्तकीला ताब्यात घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विवाहित असूनही पाच वर्षे नर्तकीसोबत प्रेमसंबंध ठेवलेल्या अश्रूबा कांबळेने एका क्षणिक उद्रेकातून स्वतःचे आयुष्य संपवले. या घटनेमुळे चोराखळी गावात तसेच धाराशीव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



