जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरालगत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले हेल्थ केअर सेंटर सध्या एका गंभीर निष्काळजीपणामुळे चर्चेत आले आहे. या केंद्रातील कार्यरत डॉक्टर कर्तव्याच्या वेळेतच खुर्चीवर पाय करून झोपलेले असल्याचा प्रकार समोर आला असून, त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या या हेल्थ केअर सेंटरमधील ही घटना चिंताजनक मानली जात आहे. कामाच्या वेळेत डॉक्टर उपचाराऐवजी झोपेत असल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय मदत न मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारामुळे आरोग्य सेवेत निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर आणि सेवा नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. संबंधित घटनेची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टरवर योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच हेल्थ केअर सेंटरच्या कार्यपद्धतीवर प्रशासनाने कठोर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे विद्यापीठाच्या आरोग्य सेवा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाकडून याबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.



