मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह तब्बल 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेची जवळपास सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, आज सायंकाळी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या तारखा, मतदानाचा कालावधी आणि निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू होणार आहे. त्यामुळे नवीन विकासकामे, धोरणात्मक निर्णय आणि घोषणांवर निर्बंध येतील. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनासह राजकीय पक्षांची हालचाल वाढणार असून, निवडणूक प्रचारालाही वेग येण्याची चिन्हे आहेत.
कालच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले असून, त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत निर्णायक मानला जात असून, आयोगाच्या निर्णयांवर पुढील राजकीय घडामोडींची दिशा ठरणार आहे.
या निवडणूक प्रक्रियेत राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांचा समावेश असून, त्यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, नवी मुंबईसह अनेक प्रमुख शहरांचा समावेश आहे. मोठी लोकसंख्या, प्रचंड आर्थिक उलाढाल आणि राजकीय महत्त्व लक्षात घेता, या निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रमुख राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे चित्र आहे.



