जळगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावातून शाळेतून घरी परतत असताना रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह तब्बल चार दिवसांच्या शोधानंतर गावालगतच्या एका विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुमारे ६० ते ७० तास चाललेल्या शोधमोहिमेचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला.

धनश्री शिंदे ही गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तातडीने शोध सुरू केला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी ती ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली होती. मात्र, त्यानंतर तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, शोधादरम्यान गावाबाहेरील शेतरस्त्यावर धनश्रीचे शालेय दप्तर आढळून आल्याने अपहरणाचा संशय अधिक बळावला होता. याप्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोमवारी (दि. १५) रोजी गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया तत्काळ राबवण्यात आली.
धनश्रीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात आहे की घातपात, तसेच अपहरणानंतर तिला विहिरीत फेकण्यात आले का, या सर्व शक्यतांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धनश्रीच्या कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला असून तरवाडे बुद्रुक गावात नि:शब्द शोककळा पसरली आहे.



