Home » जळगाव » जळगावमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी; जागावाटपावरून मतभेद..!

जळगावमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी; जागावाटपावरून मतभेद..!

जळगाव : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपावरून गंभीर मतभेद उफाळले आहेत. ठाकरे गटाने अपेक्षित जागा न दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 10 वाजता पक्षाच्या कार्यालयात निरीक्षक जयसिंगराव गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा नेत्यांची बैठक होणार असून त्यात निवडणुकीसाठी पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व कायम असताना महाविकास आघाडीला अद्याप ताळमेळ साधता आलेला नाही. सोमवारी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीने एकत्र लढण्याची घोषणा केली असताना, आघाडीत मात्र जागावाटपावरून बेबनाव झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या घडामोडींमुळे आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीत ठाकरे गटाने राष्ट्रवादीने पूर्वी लढविलेल्या जागांवर दावा केला. राष्ट्रवादीने 45 जागांची मागणी केली असता केवळ 20 ते 25 जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सन्मानजनक जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाने सर्व 75 जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्याचे महानगराध्यक्ष एजाज मलिक यांनी सांगितले.

बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी स्वबळावर लढणे आवश्यक आहे. आघाडीत सतत होणाऱ्या दुर्लक्षामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली असून, त्याचा परिणाम निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो. त्यामुळे पक्षाने स्वतंत्रपणे सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत महायुतीने एकत्रित ताकद दाखविण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत मात्र एकजूट साधता न आल्याने आगामी निवडणुकीत आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाची पुढील रणनीती निश्चित होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *