Home » जळगाव » जामनेरच्या तरुणाचा पोत्यात बांधलेला मृतदेह जंगलातील तलावात आढळला !

जामनेरच्या तरुणाचा पोत्यात बांधलेला मृतदेह जंगलातील तलावात आढळला !

जळगाव : प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, एमआयडीसी पोलिसांनी गुजरात येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय २७) हा तरुण १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता. निलेशचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. रामदेववाडी परिसरात त्याची दुचाकी मिळून आली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना काही संशयास्पद माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक पाठवून गुजरात राज्यातून भूषण बाळू पाटील आणि दिनेश चौधरी (महाजन) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी जुन्या किरकोळ वादातून निलेशची हत्या केल्याची कबुली दिली. आणि त्याला मारून पोत्यात भरून रामदेववाडी येथील जंगलामध्ये असलेल्या पाण्यात टाकून दिला.

संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली ते रामदेववाडी दरम्यानच्या जंगलात शोधमोहीम राबवली. सकाळी १० वाजेच्या सुमारास रामदेववाडी येथील घनदाट जंगलात तलावातील पाण्यात निलेशचा मृतदेह मिळून आला. या घटनेमुळे जामनेर आणि जळगाव परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *