मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या एकूण 288 जागांसाठी आज मतमोजणी सुरू झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र आहे. यामध्ये नगरपरिषदांच्या 246 आणि नगरपंचायतींच्या 42 जागांची मोजणी सुरू आहे. सध्याच्या कलानुसार महायुती तब्बल 195 जागांवर आघाडीवर असून, महाविकास आघाडी केवळ 47 जागांवर आघाडीवर आहे. भाजप सर्वाधिक 111 जागांवर आघाडीवर असून, शिंदे गट 47 आणि अजित पवार गट 34 जागांवर पुढे आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेसने 32 जागांवर आघाडी घेत तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. मात्र ठाकरे गट 7 आणि शरद पवार गट केवळ 8 जागांवर आघाडीवर असून, अपेक्षेपेक्षा फारच कमी यश मिळाल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक 24 जागांवर आघाडी घेतली आहे. शिंदे गट 5, अजित पवार गट 3, तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गट केवळ एका जागेवर आघाडीवर असून, शरद पवार गट, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीला एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही. शरद पवार गटाला एकाही नगरपंचायतीत आघाडी न मिळणे हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
नगरपरिषदांच्या निवडणुकांत भाजपने 111 जागांवर आघाडी घेत 100 चा आकडा पार केला असून, हा पराक्रम करणारा भाजप हा राज्यातील एकमेव पक्ष ठरला आहे. शिंदे गटानेही 46 जागांवर आघाडी घेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष प्रचारात मोठी आघाडी घेत गावोगावी सभा घेतल्या. आमदारांनीही ताकद लावल्यामुळे शिंदे गटाच्या पदरात हे यश पडल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा प्रचार फारसा प्रभावी न ठरल्याचे दिसून आले. बड्या नेत्यांच्या सभा अभावाने झाल्या, तसेच उद्धव ठाकरे यांनीही प्रत्यक्ष प्रचार न केल्यामुळे ठाकरे गटाला या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.



