Home » महाराष्ट्र » मुख्यमंत्रीपदही शाश्वत नाही : मुनगंटीवारांचा फडणवीस–बावनकुळेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्रीपदही शाश्वत नाही : मुनगंटीवारांचा फडणवीस–बावनकुळेंवर हल्लाबोल

चंद्रपूर  : वृत्तसंस्था 

चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत काँग्रेसने प्रचंड मुसंडी मारल्याने भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता उफाळून आली असून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट राज्यातील भाजप नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. “मुख्यमंत्रीपद असो वा मंत्रिपद, काहीही शाश्वत नसते” असे तिखट विधान करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

नगरपालिका निवडणुकांत राज्यभर भाजपला यश मिळाले असले, तरी चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. जिल्ह्यातील ११ पैकी तब्बल ८ नगराध्यक्षपदे काँग्रेसने जिंकली, तर भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या धोरणांवर आणि स्थानिक पातळीवरील निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुनगंटीवार म्हणाले, “मी कधीच नाराज नसतो. नाराज असण्याची शक्ती महादेवाने मला दिलेली नाही. मात्र, एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून योग्य वेळी योग्य सल्ला देणे ही माझी जबाबदारी आहे. मंत्रिपद येते आणि जाते. मुख्यमंत्रीपदही शाश्वत नसते. शेवटच्या श्वासापर्यंत कुणीही मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नसतो.”

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुनगंटीवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असतानाच मुनगंटीवार यांनी त्यांच्या विधानांचाही समाचार घेतला. “मंत्रिपद नसण्याचा आणि पराभवाचा संबंध नसतो, असे वाटणे साहजिक आहे. पण जेव्हा तुमची शक्ती कमी करण्यात आली होती, तेव्हा तुम्हालाही असेच वाटत होते,” असे म्हणत त्यांनी बावनकुळे यांना त्यांच्या पडत्या काळाची आठवण करून दिली.

दरम्यान, भाजपने विदर्भात १०० पैकी ५५ जागांवर विजय मिळवला असला, तरी चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहिला. याबाबत मुनगंटीवार म्हणाले की, “काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, पण माझ्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. यामुळे जिल्ह्यात गटबाजीला पोषक वातावरण तयार झाले.” मुनगंटीवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “पक्षाला दार नसावे. कोणासाठीही दारे बंद नसावीत. प्रवेश देताना पक्षाला फायदा होईल का, हे पाहणे गरजेचे आहे. सुधीरभाऊंना काही ताकद कमी पडली असेल तर महापालिका निवडणुकीत त्याची भरपाई करू. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूर महापालिका जिंकू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *