कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर–मुंबई महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या एका सिनेस्टाईल दरोड्याने प्रवाशांमध्ये आणि खासगी बस चालकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला गाठून सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे १ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीची खासगी आराम बस (क्रमांक MH 09 GJ 7272) रविवारी रात्री सुमारे ११ वाजता कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना झाली होती. कोल्हापूर शहराबाहेरील तावडे हॉटेल परिसरातून तीन अनोळखी व्यक्ती प्रवासी म्हणून बसमध्ये चढल्या. ही बस पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी गावच्या हद्दीतील ‘भुताचा माळ’ परिसरात पोहोचताच बसमधील त्या तिघांनी अचानक चाकूचा धाक दाखवून चालकाला बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यास भाग पाडले.
बस थांबताच पाठीमागून एका वाहनातून आलेल्या पाच ते सहा साथीदारांनी बसला वेढा घातला. सर्व दरोडेखोर बसमध्ये घुसून अरेरावी करत प्रवाशांना धमकावू लागले. त्यांनी बसमधील सुतळी बारदानातील ३४ किलो आणि प्लास्टिक पोत्यातील २६ किलो अशी एकूण ६० किलो चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट, १० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच मोबाईल हँडसेट असा एकूण १ कोटी २२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी बस चालक व प्रवाशांना सज्जड दम देत, “या परिसरात थांबू नका, पुढे निघून जा, नाहीतर जीवानिशी मारू,” अशी धमकी दिली आणि ते पसार झाले. अत्यंत घाबरलेल्या चालकाने बस थेट पुढे नेऊन सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे थांबवत ‘११२’ क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच सांगली व कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच बसमधील प्रवाशांच्या वर्णनाच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. निवडणूक जल्लोषात न्हाऊन निघालेल्या जिल्ह्यात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महामार्गावर खासगी बस लुटली गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



