मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्ष प्रचारात आक्रमक झाले आहेत. अशातच मिरा-भाईंदर येथे भाजपचे आक्रमक नेते व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या विधानामुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिरा-भाईंदर येथे आयोजित सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले, “मिरा-भाईंदरच्या आजूबाजूला किती हिरवे साप वळवळ करत आहेत ते बघा. अशा हिरव्या सापांना दूध पाजू नका. हे कधीच तुमचे होणार नाहीत. ते तुम्हाला त्यांच्या खिशातले काढून देणार नाहीत. गोलटोपी आणि हिरवे साप मोठ्या प्रमाणात येथून मच्छी मारून घेऊन जात आहेत, म्हणूनच आम्ही ड्रोन सुरू केले आहेत,” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, “एकदा तुम्ही मला पाच वर्षे द्या, मी संपूर्ण भागाचा विकास करून दाखवीन. २०२६ मध्ये मुख्यमंत्री मत्स्य विकास योजना सुरू केली जाईल. त्याचबरोबर २०२६ मध्ये एकूण २६ योजना राबवण्यात येतील. तुमचे सर्व प्रश्न आम्ही सोडवू, मात्र मतदान त्यांना करू नका,” असे आवाहन त्यांनी केले. मत्स्यव्यवसायाबाबत बोलताना राणे म्हणाले, “आम्ही पहिल्या १०० दिवसांत मच्छीमारीला शेतीचा दर्जा दिला आहे. जशी भरपाई शेतकऱ्यांना मिळते, तशीच भरपाई मच्छीमारांनाही दिली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच, “आमचे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे असून संपूर्ण समाजाची काळजी घेणारे आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालतो. मात्र जर कोणी हिंदू राष्ट्राच्या विरोधात वाकड्या नजरेने पाहिले, तर तो शुक्रवारी दोन पायांवर चालणार नाही याची काळजी घेणारेही आम्ही आहोत,” असे वक्तव्य करत राणेंनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले. या विधानांमुळे विरोधकांनी कडाडून टीका केली असून, निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



