नाशिक : वृत्तसंस्था
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. “प्रभू श्रीरामांच्या पंचवटीत झाडे तोडण्याचे काम राक्षसच करू शकतात. साधुग्रामच्या नावाखाली तपोवनाची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन परिसराला भेट देत वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भाजपचे हिंदुत्व हे केवळ निवडणुकीपुरते आहे. “भाजप देशात रामराज्य नव्हे, तर रावणराज्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप म्हणजे बिल्डर जनता पार्टी आहे,” अशी टीका त्यांनी केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले की, “भाजपचा आमदार असल्यामुळे बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यानंतरही एका आमदाराला जामीन मिळतो. ज्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी, त्याला बेल मिळते.” तसेच बिलकिस बानो प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेवर बोललो म्हणून मुख्यमंत्री चिडले होते, पण राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारीवर ते काहीच बोलत नाहीत. भाजप धर्माचे राजकारण करतो. मग पालघर साधू हत्याकांडातील आरोपींना पक्षात का घेतले?” खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे ही भाजपची सवय असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, विकासाच्या मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईत चार मेडिकल कॉलेज सुरू झाली. आता नाशिक महापालिकेत किमान एक मेडिकल कॉलेज आणायचे आहे. नाशिकमधील प्रत्येक वॉर्डात सुसज्ज शाळा उभारायच्या आहेत. आम्ही मुंबईत करून दाखवले आहे, तेच नाशिकमध्ये करून दाखवू.”
“आपल्याला तपोवन वाचवायचे आहे. भाजपने फक्त कर वाढवण्याचे काम केले आहे, तर आम्ही प्रत्यक्षात परिवर्तन घडवून आणणार आहोत. आमचे चिन्हच परिवर्तनाचे आहे,” असे सांगत त्यांनी आगामी काळात युतीबाबत सकारात्मक बातमी मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. “पुढील २४ तासांत युतीची गोड बातमी मिळेल,” असे सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केले.



