Home » महाराष्ट्र » जळगाव मनपा निवडणुकीत नाराजीचा सूर; जुने नगरसेवक अडचणीत, पक्षांची नव्या चेहऱ्यांकडे वळण

जळगाव मनपा निवडणुकीत नाराजीचा सूर; जुने नगरसेवक अडचणीत, पक्षांची नव्या चेहऱ्यांकडे वळण

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असली तरी, यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांना नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. मागील कार्यकाळात दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने बहुतांश प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

नागरिक उघडपणे विरोध व्यक्त करत नसले, तरी त्यांच्या मनातील नाराजी राजकीय पक्षांना जाणवत असून त्याचा थेट परिणाम उमेदवार निवडीवर होत असल्याची चर्चा आहे. अनेक प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, यामुळे पक्षांना सुरक्षित व स्वीकारार्ह उमेदवारांचा शोध घ्यावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर बहुतांश राजकीय पक्षांनी थेट विद्यमान नगरसेवकांवर विश्वास न ठेवता, दुसऱ्या फळीतील, तुलनेने स्वच्छ प्रतिमा असलेल्या किंवा नागरिकांमध्ये फारसा विरोध नसलेल्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अंतिम क्षणी निश्चित करून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ‘एबी फॉर्म’ देण्याची रणनीती अवलंबली जाणार असल्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत आहेत.

शहरातील काही भागांमध्ये नगरसेवकांनी ठेकेदारांसारखी भूमिका घेतल्याने विकासकामे झाली असली, तरी त्या कामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाकडून प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अपेक्षित गुणवत्तेच्या कामांवर खर्च न झाल्याची भावना पसरली असून, त्यामुळे अशा नगरसेवकांना यंदाच्या निवडणुकीत मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही इच्छुक उमेदवारांकडून आर्थिक बळाच्या जोरावर उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतर्गत नाराजी, उमेदवार बदल आणि नव्या चेहऱ्यांची चाचपणी यामुळे जळगाव मनपा निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *