Home » महाराष्ट्र » प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणावर चॉपरने हल्ला; गोलाणी मार्केटमध्ये खून, एकास अटक

प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणावर चॉपरने हल्ला; गोलाणी मार्केटमध्ये खून, एकास अटक

जळगाव : प्रतिनिधी

मैत्री म्हणून बोलणे असलेल्या तरुणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून जय उर्फ साई गणेश गोराडे (वय १८, रा. दशरथनगर) या तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला. उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट परिसरात घडली. या प्रकरणी शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौघुले प्लॉट) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दशरथनगर येथील जय गोराडे हा देवकर महाविद्यालयात डिप्लोमा द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीसोबत त्याची मैत्री होती. मात्र, या मैत्रीचे प्रेमप्रकरणात रूपांतर झाल्याचा संशय शुभम सोनवणे याला होता. याच संशयातून बुधवारी दुपारी जय हा गोलाणी मार्केट परिसरात आला असताना शुभम व जय यांच्यात वाद होऊन झटापट झाली. वादाचे रुपांतर हिंसक घटनेत होत शुभमने चॉपरने जयवर वार केले, ज्यामुळे जय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर रुग्णालयात जयच्या मित्रांसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

घटना घडत असताना एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी रमेश चौधरी हे त्या मार्गावरून जात होते. त्यांनी शुभम हा जयवर चॉपरने वार करत असल्याचे पाहून तत्काळ हस्तक्षेप करून त्याला पकडून ठेवले व शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर शुभमला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास शहर पोलिस ठाण्याकडून सुरू असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *