जळगाव : प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना वाळू माफियांनी थेट तलाठ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करून आणत असताना वाळू माफियांनी पाचोरा येथील तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर (वय २५) यांना मारहाण करत ट्रॅक्टर पकडल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी सुरनर यांची अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कारवाईसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास अंतुर्ली रोडकडे अवैध वाळूने भरलेले विनानंबरचे ट्रॅक्टर जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ट्रॅक्टर अडवून ओळखपत्र दाखवत चालकाला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेऊन जाण्याचे आदेश दिले. दरम्यान, जप्त केलेले ट्रॅक्टर एका सहकारी तलाठ्याच्या मदतीने तहसील कार्यालयात आणत असताना दुचाकी (एमएच १९/डीके ०६३७) आडवी लावून अडथळा निर्माण करण्यात आला. त्यानंतर दोन जणांनी तलाठी सुरनर यांच्यावर हल्ला करून जोरदार मारहाण केली. काही वेळातच आणखी एकजण दुचाकीवरून घटनास्थळी आला. या तिघांनी शिवीगाळ करत तलाठ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच एका आरोपीने तलाठी सुरनर यांचा मोबाईल फोन दूर फेकून दिला.
या प्रकरणी आशिष उर्फ लड्डू चव्हाण (रा. पुनगाव, ता. पाचोरा), ट्रॅक्टर चालक व एक अज्ञात व्यक्ती अशा तिघांविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्यापर्यंत वाळू माफियांची मजल गेली असून, त्यांचा वाढता मुजोरपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.



