शिरसोली : प्रतिनिधी
लोकशाहीचा कणा असलेल्या ग्रामसभेला जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.नं. ग्रामपंचायतीत प्रशासकीय गोंधळाचे ग्रहण लागले आहे. ग्रामसभा सुरू असताना नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी चक्क ग्रामसेवकानेच सभेतून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामसभेतील ठराव प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला असून, प्रशासनाने नागरिकांची दिशाभूल केल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कायदेशीर प्रक्रियेची पायमल्ली
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामसभा सुरू असताना ग्रामसेवक उपस्थित होते. मात्र, विषय पत्रिकेवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्यापूर्वीच, कोणताही अधिकृत स्थगन आदेश नसताना ग्रामसेवकाने काढता पाय घेतला. ग्रामसेवकाच्या गैरहजेरीत पार पडलेली ठराव प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचा दावा आता केला जात आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ नुसार ग्रामसभेचे कामकाज सचिवाने पूर्ण करणे बंधनकारक असताना, शिरसोलीत मात्र नियमांची सर्रास पायमल्ली झाल्याचे चित्र आहे.
नागरिकांची दिशाभूल आणि संभ्रम
सभेत प्रामुख्याने घरपट्टी वाढ, कर आकारणी आणि गावातील वाढते अतिक्रमण यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र, ग्रामसेवकाच्या पलायनामुळे या विषयांवर कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नाही. “प्रशासन आपली जबाबदारी झटकून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे,” अशा तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
चौकशीची आणि फेर-ग्रामसभेची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, संशयास्पद ठरलेली ही ग्रामसभा तात्काळ रद्द करण्यात यावी आणि पुन्हा नव्याने पारदर्शक पद्धतीने ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषद आणि गट विकास अधिकारी (BDO) यांच्याकडे तक्रार दाखल करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली आहे.



