मुंबई : वृत्तसंस्था
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद गट निवडणुकांत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटातून त्यांचे निकटवर्तीय अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला असून शिवसेनेच्या कविता ओंबळे यांनी विजय मिळवला आहे. या गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला.

कुसुंबी गटातून जिल्हा मध्यवर्ती बँकेअ चे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे, याच ज्ञानदेव रांजणे यांनी यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. मात्र, या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला कुसुंबी गटात मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनाही जिल्ह्यात सलग धक्के बसले आहेत. माण तालुक्यातील कुकुडवाड गटात त्यांचे बंधू अरुण गोरे यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. तसेच औंध गटात जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा अवघ्या ४० मतांनी पराभव झाला. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा फडतरे विजयी झाल्या आहेत.
मात्र, आंधळी गटात भाजपला दिलासा मिळाला असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे यांनी तब्बल १८ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या उमेदवारीला मंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र विरोध केला होता. दरम्यान, पाटण पंचायत समितीत मंत्री शंभुराज देसाई यांनी सत्तांतर घडवून आणत आपला राजकीय दबदबा कायम ठेवला आहे.


