September 27, 2026 2:28 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » महाराष्ट्र बारावी परीक्षा १० फेब्रुवारीपासून; १५.३ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

महाराष्ट्र बारावी परीक्षा १० फेब्रुवारीपासून; १५.३ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

मुंबई : वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची मुख्य परीक्षा १० फेब्रुवारीपासून राज्यभर सुरू होत आहे. यंदा विक्रमी १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ३,३८७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी आज पत्रकार परिषदेत परीक्षा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि ‘पेपर लीक’ रोखण्यासाठी घेतलेले उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली.

यंदा ७,९९,७७३ विद्यार्थी विज्ञान शाखेच्या परीक्षा देणार आहेत, ३,८०,६९२ विद्यार्थी कला शाखेच्या, तर ३,२०,०५२ विद्यार्थी वाणिज्य शाखेच्या परीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर, किमान कौशल्य आणि आयटीआय टेक्निकल सायन्सच्या काही विद्यार्थ्याही परीक्षा देणार आहेत.

परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी बोर्डाने महत्त्वाचा बदल केला आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याआधी १० मिनिटे प्रश्नपत्रिका वाचायला मिळायची, पण या काळात पेपरचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता वाढत होती. यावर उपाय म्हणून, यंदा १० मिनिटांचा वेळ पेपरच्या शेवटी जोडण्यात आला आहे. म्हणजे पेपर ११ वाजता विद्यार्थ्यांच्या हातात दिला जाईल, ज्यामुळे प्रश्नपत्रिका बाहेर जाण्यापासून प्रतिबंध होईल आणि ‘पेपर लीक’ रोखता येईल, असा विश्वास बेडसे यांनी व्यक्त केला.

कोणताही विद्यार्थी परीक्षेस वंचित राहू नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन समुपदेशक नेमले गेले आहेत, तर बोर्ड स्तरावर १० समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वजण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करतील. काही पेपर सकाळी ११ वाजता तर काही दुपारी ३ वाजता सुरू होतील. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित रहावे.

परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्राभोवती ५०० मीटरच्या परिसरातील सर्व झेरॉक्स दुकान बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश करताना १ ते ५० यानुसार टोकन नंबर दिला जाईल, जेणेकरून कोणाची तपासणी झाली आहे हे नोंद राहील. तसेच प्रत्येक केंद्रावरील रनर, पर्यवेक्षक यांच्या वेब कॅमेरे आणि झूम लिंकद्वारे नियंत्रण कक्षातून सर्व हालचालींचे निरीक्षण केले जाईल. बेडसे म्हणाले, “या सर्व उपाययोजनांमुळे परीक्षा पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांना लेखनासाठी पुरेसा वेळ मिळेल. आमचा मुख्य उद्देश पेपर लीक आणि इतर गैरप्रकार टाळणे हा आहे.”

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!