Home » महाराष्ट्र » अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी व्हावी : मुख्यमंत्री फडणवीस !

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी व्हावी : मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई: वृत्तसंस्था

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणावर ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले की, या घटनेचे सत्य लवकरच बाहेर येईल. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडे असलेली माहिती व पुरावे तपास यंत्रणांना देण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, “अजित पवार हे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेते होते. त्यांच्या अपघाताची पूर्ण आणि सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. ही मागणी चुकीची नाही, तर योग्य आणि नैतिक आहे. मीच यासाठी केंद्र सरकारकडे पत्र पाठवून विशेष चौकशीची मागणी केली होती. आता ती चौकशी सुरु आहे.”

ते पुढे म्हणाले की, “वेगवेगळ्या माध्यमांनी आणि लोकांनी या घटनेविषयी काही शंका व्यक्त केल्या आहेत. परंतु भारतीय तपास यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे आणि या चौकशीत पारदर्शकता राखली जाईल. ब्लॅकबॉक्स पूर्णपणे सापडला असून, पायलट व एटीसीमधील कम्युनिकेशन डिजिटली उपलब्ध आहे. अपघात स्थळावरील सर्व नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी घेतले गेले आहेत.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवू नये असे सांगितले. “डीजी एव्हिएशन सेफ्टी ही देशातील सर्वात मोठी आणि आंतरराष्ट्रीय मानकांची यंत्रणा आहे. अनेक छोट्या देशांतील अधिकारी देखील यांच्याकडून चौकशीसाठी आमच्या देशात येतात. भावनेच्या भरात काही बोलले गेले असतील, तरीही यंत्रणांवर अविश्वास दाखवणे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांनी तपास यंत्रणेला उपलब्ध पुरावे देणे आवश्यक असल्याचेही सांगितले, जेणेकरून चौकशी पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष होईल.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *