Home » जळगाव » सावद्यात आमदार खडसे यांच्यावर गुन्हा; पोलिस अधिकाऱ्याला धमकीचा आरोप

सावद्यात आमदार खडसे यांच्यावर गुन्हा; पोलिस अधिकाऱ्याला धमकीचा आरोप

जळगाव : प्रतिनिधी

मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर ठेवण्यात आला असून, याप्रकरणी बुधवारी सायंकाळी सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी सावदा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आमदार खडसे यांनी त्यांना बोलावून घेतले. तासखेडा (ता. रावेर) येथील गौण खनिज प्रकरणात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा जाब विचारत त्यांनी मोठ्या आवाजात आरडाओरडा केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच “तुम्ही कोट्यवधी रुपये खाल्ले आहेत” असे म्हणत अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी अधिकाऱ्यांनी २९ जानेवारी २०२६ रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी भातेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली. मात्र, तपास सुरू असल्यामुळे कागदपत्रे देण्यास नकार दिल्यानंतर खडसे अधिकच संतप्त झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. “आगामी अधिवेशनात बघून घेतो, अँटी करप्शनचा ट्रॅप लावतो,” अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यासोबतच संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने मंत्र्यांविरोधात अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर सहायक पोलिस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सावदा पोलिस ठाण्यात आमदार खडसे यांच्याविरुद्ध दमदाटी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *