पाचोरा : प्रतिनिधी
ऑनलाइन पार्टटाइम काम व ‘मर्चट टास्क’ पूर्ण करून मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या पाचोरा येथील एका उच्चशिक्षित महिलेची तब्बल ८ लाख ५० हजार ८०० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील रहिवासी कीर्ती दिलीप येवले (वय ३२) या खासगी नोकरी करतात. ८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘अरोकीया जेनीता’ नावाच्या महिलेने, स्वतःला एनएसईच्या प्रशासकीय विभागात कार्यरत असल्याचे सांगत, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ‘ऐंजलिया’ नावाच्या अॅडव्हायजरने टेलिग्रामवरून संवाद साधत ‘एनएसई मर्चट टास्क’ पूर्ण केल्यास मोठा आर्थिक लाभ मिळेल, असे आमिष दाखवले.
सुरुवातीला काही टास्क पूर्ण केल्यानंतर थोडाफार परतावा देऊन तक्रारदार महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम भरण्यास सांगण्यात आले. अवघ्या चार दिवसांत, म्हणजे ८ ते १२ जानेवारीदरम्यान, कीर्ती येवले यांच्याकडून एकूण ८ लाख ५० हजार ८०० रुपये ऑनलाइन स्वरूपात जमा करून घेण्यात आले. मात्र, त्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी १० फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाइन टास्क, गुंतवणूक किंवा पार्टटाइम नोकरीच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.



