September 21, 2026 10:24 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » चार वेळा चोरी, दोनच गुन्हे दाखल : उद्या मुख्यमंत्र्यांसमोरचा करणार आत्मदहन !

चार वेळा चोरी, दोनच गुन्हे दाखल : उद्या मुख्यमंत्र्यांसमोरचा करणार आत्मदहन !

जळगाव : प्रतिनिधी

विद्युत खांबांवरील अॅल्युमिनियमच्या तारा एकाच ठिकाणावरून चार वेळा चोरीस जाऊनही पोलिस नंतरचे दोन गुन्हे दाखल करीत नाहीत, त्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करीत नाहीत, असा आरोप सरकारी कामांचे कंत्राटदार संजय वराडे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या लेखी निवेदनात केला आहे. या चोऱ्यांमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्यामुळे २० जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासमोरच आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पोलिस महानिरीक्षक (नाशिक), यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षकांना संजय वराडे यांनी हे लेखी निवेदन दिले आहे. त्यात वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित पोलिस कर्मचारी माहिती देत नाहीत आणि दोन चोऱ्यांचा गुन्हाही नोंदवत नाहीत, असा थेट आरोप केला आहे. आपण स्वतःच पोलिसांना सहा आरोपी पकडून दिले होते; पण पोलिसांनी दोघांवरच गुन्हा दाखल केला आणि मुख्य आरोपीला साक्षीदार बनवले. आपण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर १५ जून रोजी आपल्याविरोधात गुंडांना लावून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही संजय वराडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात वराडे यांनी पोलिस अतुल वंजारी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. वंजारी आठ वर्षांपासून एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्त आहे. आता त्यांची भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बदली केली होती; मात्र पुन्हा लगेच बदली स्थगित करून एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. अतुल वंजारी हे आपल्याकडे झालेल्या चोऱ्यांचा तपास स्वतःकडे घेतात आणि प्रत्यक्षात तपास न करता चोरांना मदत करतात, असेही आरोप केले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास आपण २० जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर किंवा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करू आणि त्याला पोलिस अधीक्षक जबाबदार असतील, असेही निवेदनात म्हटले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!