Home » क्रिकेट » क्रीडाप्रेमींसाठी दिलासादायक निर्णय : अटींसह सागर पार्क मैदान क्रिकेटसाठी खुले राहणार

क्रीडाप्रेमींसाठी दिलासादायक निर्णय : अटींसह सागर पार्क मैदान क्रिकेटसाठी खुले राहणार

पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या सागर पार्क मैदानावर क्रिकेट खेळासाठी बंदी घालण्याच्या प्रस्तावावर अखेर तोडगा निघाला असून, काही अटी आणि नियमांसह मैदान क्रिकेट लीग व खेळासाठी उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आगामी महासभेत सागर पार्क मैदान खेळासाठी आरक्षित न ठेवण्याचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. नगरसेवक नितीन बरडे यांनी मांडलेल्या या प्रस्तावामुळे शहरातील क्रीडा वर्तुळात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. क्रिकेटप्रेमी, स्थानिक खेळाडू आणि विविध क्रीडा संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत मैदान कायम खेळासाठी खुले ठेवण्याची मागणी केली होती.
हा विषय आमदार राजुमामा भोळे, उपमहापौर मनोज चौधरी तसेच पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर आज पक्षांतर्गत बैठक घेण्यात आली. या बैठकीत मैदान पूर्णपणे बंद न करता काही नियम लागू करून खेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मैदानावर डीजे आणि मोठ्या आवाजातील साउंड सिस्टिमवर निर्बंध असतील. तसेच दहावी-बारावी परीक्षांच्या काळात क्रिकेट स्पर्धा किंवा सरावाला तात्पुरती बंदी घालण्यात येऊ शकते. परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेत नियमावली तयार केली जाणार असल्याचे समजते.
या निर्णयामुळे जळगावातील क्रिकेटप्रेमींमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, सागर पार्क मैदान पुन्हा एकदा खेळाडूंसाठी हक्काचे ठिकाण राहणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *