Home » जळगाव » “मनपाचा उल्लेखच नाही!” भंगाळे गोल्डविरोधात ॲड. पियुष पाटील यांची तक्रार

“मनपाचा उल्लेखच नाही!” भंगाळे गोल्डविरोधात ॲड. पियुष पाटील यांची तक्रार

जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा मार्गावरील दुभाजक विकास व सुशोभीकरण कामात मनपा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केला आहे. संबंधित काम करणाऱ्या ‘भंगाळे गोल्ड’ व्यवस्थापनावर तात्काळ कारवाई करून करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी जळगाव शहर महानगरपालिकेकडे केली आहे.

जळगाव महानगरपालिकेतर्फे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी, झाडे लावणे व देखभाल करण्यासाठी विविध संस्था व व्यावसायिकांना परवानगी देण्यात आलेली आहे. या करारानुसार संबंधित जाहिरात फलकांमध्ये ४० टक्के जागा महानगरपालिकेच्या नावासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे, तर उर्वरित ६० टक्के जागा संबंधित व्यावसायिकांच्या जाहिरातीसाठी वापरता येते. तसेच प्रत्येक जाहिरात फलकामध्ये किमान १० मीटर अंतर ठेवणे आवश्यक आहे.

मात्र, स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा या मार्गावरील दुभाजकांवर लावण्यात आलेल्या फलकांमध्ये महानगरपालिकेचा कुठेही उल्लेख नसून १०० टक्के जाहिरात ही ‘भंगाळे गोल्ड’चीच करण्यात आल्याचा आरोप ॲड. पाटील यांनी केला आहे. तसेच जाहिरात फलकांमध्ये आवश्यक अंतर देखील ठेवण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भंगाळे गोल्डकडून यापूर्वीही शहरात अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज लावण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्या वेळी महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाईही करण्यात आल्याचे समोर आले होते. तरीदेखील नियमभंग सुरूच असल्याचा आरोप करत ॲड. पाटील यांनी प्रशासनाने समान न्यायाची भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.

“सर्वसामान्य नागरिक व लहान व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागाकडून कठोर कारवाई केली जाते. मग मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई करताना प्रशासन मवाळ भूमिका का घेत आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात महापौर, आयुक्त तसेच संबंधित पर्यावरण विभाग अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही ॲड. पाटील यांनी दिली. तसेच संबंधित व्यवस्थापनाशी निगडित व्यक्ती सत्ताधारी गटातील विद्यमान नगरसेवक व माजी महापौर असल्याने प्रशासनावर दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आता मनपा प्रशासन नियमभंगाच्या या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *