पब्लिक लाईव्ह न्यूज : (प्रतिनिधी) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईत आता आणखी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या उपनिबंधकाच्या लॉकरमधून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपी जगदीश बाबुराव बारी (वय ५६, रा. शांतीनगर, यावल रोड, भुसावळ) हे सहकार विभागातील वर्ग-१ अधिकारी आहेत. त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० मे रोजी एसीबीने त्यांच्यावर यशस्वी सापळा कारवाई केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आरोपीच्या घरझडतीदरम्यान कॉसमॉस बँक, भुसावळ येथे लॉकर असल्याची माहिती एसीबीला मिळाली. त्यानुसार दोन पंचांच्या उपस्थितीत लॉकरची तपासणी करण्यात आली. या झडतीत ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याचे बिस्किट असा तब्बल ९९ लाख ४ हजार ९६० रुपये किमतीचा ऐवज आढळून आला.
याशिवाय ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तसेच २ हजार ६२५ रुपये किमतीचे चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले. एकूण १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये किमतीचा मुद्देमाल एसीबीने ताब्यात घेतला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस हवालदार संगिता पवार, पोलीस कर्मचारी प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सूर्यवंशी आणि चंद्रशेखर चौधरी यांच्या पथकाने केली.
दरम्यान, लाच प्रकरणानंतर समोर आलेल्या या कोट्यवधींच्या संपत्तीमुळे जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली असून, एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


