पब्लिक लाईव्ह न्यूज | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी मोठी कारवाई करत उपनिबंधक कार्यालयाशी संबंधित दोन जणांना १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात आणि शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी आणि जळगाव जिल्हा बँक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी देविदास धनसिंग पाटील यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध अवैध सावकारी कायद्यांतर्गत चौकशी सुरू होती. या प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी सुरुवातीला ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. नंतर तडजोडीअंती ३ लाख रुपयांवर व्यवहार ठरला.
या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये बुधवार, २० मे रोजी बी.जे. मार्केट येथील कार्यालयात स्वीकारण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याबाबत ACBकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपी जगदीश बारी यांच्या सांगण्यावरून देविदास पाटील यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच ACBच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
आरोपी जगदीश बारी हे उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव येथे कार्यरत असून देविदास पाटील हे जळगाव जिल्हा बँक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी आहेत. दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे तसेच त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACBतर्फे करण्यात आले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


