जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे निर्देश महापौर दीपमाला काळे यांनी दिले आहेत. त्यानुसार मनपा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा करावयाचे असल्यास ४५ मिनिटं पाणी पुरवठा सुरु ठेवता येईल, असा अंदाज पाणी पुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असून दीड ते दोन तास पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, एक दिवसाआड पाणी पुरवठा करावयाचा असल्यास पाणी सोडण्याच्या टायमिंगमध्ये बदल होणार असून दीड-दोन तासांऐवजी ४५ मिनिटे पाणी पुरवठा सुरु ठेवता येईल, असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच एक दिवसाआड पाणी पुरवठा करतांना मॅनपॉवरसह अनेक अडचणींचा सामना देखील प्रशासनाला करावा लागणार आहे परंतु महापौरांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपा आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाला तातडीने एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगाने नियोजन करावे, असे आदेश दिले आहेत. सोमवारी मनपा आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अश्या सूचना दिल्या आहेत.
जळगाव शहरात ८५ हजाराहून अधिक नळ कनेक्शन आहेत. शहरवासियांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी वाघूर धरणातून दररोज ९० एमएलडी पाण्याची उचल केली जात असून त्यावर प्रक्रिया करून ७५ एमएलडी पाणी शहरवासियांना देण्यात येत आहे. सध्या धरणात ८६ टक्के जलसाठा शिल्लक असून आता उन्हाळा लागल्यानंतर दररोज बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणार आहे



