जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताच प्रशासनात नवचैतन्य निर्माण केले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियान संचालक म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’
पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी तत्काळ कामाला सुरुवात करत जिल्हा परिषदेच्या नवीन व जुन्या इमारतीतील सर्व विभागांना भेटी दिल्या. प्रत्येक विभागात जाऊन त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला.
या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रशासनाला गतीची अपेक्षा
नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच घेतलेली सक्रिय भूमिका आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Author: K P Chavan
thepubliclive



