राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे पडसाद आता जळगाव जिल्ह्यात उमटू लागले आहेत. बोगस शिक्षक व कर्मचाऱ्यांना शासकीय वेतन मिळाल्याच्या संशयावरून तब्बल ४८ आजी-माजी शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी आजपासून सुरू करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात शालार्थ प्रणालीद्वारे काही शिक्षकांचे आयडी नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील नाशिक, जळगाव व नंदुरबार परिसरात या घोटाळ्याचे जाळे पसरल्याचे समोर आले असून अनेक बोगस नियुक्त्यांवर तपास यंत्रणा लक्ष केंद्रित करत आहे. काही प्रकरणांमध्ये पात्रता नसतानाही वेतन काढल्याचा आरोप तपासात समोर येत असल्याची माहिती मिळत आहे.
तपास समितीकडून संबंधित अधिकाऱ्यांची जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दोषी आढळणाऱ्यांवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिक्षण विभागातील या घोटाळ्यामुळे राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Author: K P Chavan
thepubliclive


