जळगाव :दि. 16 प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित तसेच अलरीक इलेक्ट्रिकल्स सहप्रायोजित जळगाव क्रिकेट लीग-2026 (JCL T-20) स्पर्धेचा बिगुल वाजला असून शहरात भव्य रॅली काढून या स्पर्धेची जोरदार सुरुवात करण्यात आली.
ही स्पर्धा 18 ते 26 एप्रिल दरम्यान कांताई नगर, जैन ड्रिम स्पेसेस, मेहरूण तलावाजवळ येथे रंगणार असून जळगावकर क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काव्यरत्नावली चौक येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्यासह विविध मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवली.
या रॅलीमध्ये सहा संघांचे मालक, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
रॅलीचा मार्ग काव्यरत्नावली चौक येथून सुरू होऊन कलेक्टर बंगला, एम. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा काव्यरत्नावली चौक येथे समाप्त झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहा संघांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यात जळगाव कोगटा किंग, पाचोरा एसकेटी योद्धाज, जामनेर सातपुडा हिरोज, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स, अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स या संघांचा समावेश आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


