Home » जळगाव » भुसावळ » “भुसावळात बांगलादेशी महिला अटकेत! बनावट भारतीय पासपोर्टसह मोठा खुलासा”

“भुसावळात बांगलादेशी महिला अटकेत! बनावट भारतीय पासपोर्टसह मोठा खुलासा”

भुसावळ : जळगाव पोलिसांनी भुसावळ शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेविरुद्ध मोठी कारवाई करत तिला अटक केली आहे. बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या या महिलेविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. २६५/२६ अन्वये इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ अंतर्गत कलम २१, २२ व २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस तपासात आरोपी महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२), रा. भीमकाठी, उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपुर, बांगलादेश असे असल्याचे निष्पन्न झाले. भारतात आल्यानंतर ती “जस्मिन बी मोहम्मद खान” या नावाने दीनदयाल नगर, भुसावळ येथे राहत होती.

प्राथमिक चौकशीत आरोपीने सन २००९ मध्ये एका दलालास ५ हजार रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर ती रेल्वेने भुसावळ येथे आल्याचे उघड झाले आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून Samsung Galaxy मोबाईल जप्त केला. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणात IMO आणि WhatsApp ॲपवरून +880 या बांगलादेशी कंट्री कोड असलेल्या क्रमांकांशी सातत्याने संपर्क, चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल्स झाल्याचे पुरावे मिळाले. मोबाईलमध्ये आरोपीच्या जन्मदाखल्याची प्रतही आढळून आली.

पुढील चौकशीत आरोपीने मृत बहिणीच्या नावावरील लाईट बिल व इतर कागदपत्रांचा वापर करून स्वतःचे रेशन कार्ड, Aadhaar कार्ड, मतदान ओळखपत्र, PAN कार्ड, बँक पासबुक तसेच भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे आरोपी महिला मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परत आल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून देणारे एजंट, दलाल आणि संबंधित व्यक्तींचा शोध सुरू असून पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, जळगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात संशयास्पद व्यक्ती अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *